Thursday, December 20, 2012

अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह

अप्पूघर - दुर्गादेवी मंदिर -भक्ती-शक्ती शिल्पसमूह

रविवार होता. दुपारी जेवण झाल्यावर झोपण्यापेक्षा हिंडणे बरे म्हणून गाडीवरून निघालो. ते अप्पूरघरला. पुण्याकडून मुंबईला जाताना पिंपरी-चिंचवड शहर लागते. शहराची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. जुने रस्ते जाऊन नवीन सहा पदरी रस्ते, मोठे पूल बनू लागले.

अप्पूघर :

या ठिकाणी अप्पूघर व दुर्गादेवी टेकडी या नावाने प्रसिद्ध अशी बघण्यासारखी दोन ठिकाणो आहेत. संजय गांधी उद्यान असे नाव आहे. पुण्याकडून बसने यायचे झाल्यास पिंपरी, आकुर्डीनंतर निगडी जकात नाका येतो. येथून डावीकडून सुमारे 2 किलोमीटरवर अप्पूघरकडे जाता येते. अप्पूघरला मनोरंजनाचे व लहान मुलांसाठी खेळ उभारलेले आहेत. यात माय फेअर लेडी, मेरी गो राउंड, धडक गाडी, हसरा विदुषक असे खेळ आहे. मात्र, हे खेळ पाहण्यासाठी सुद्धा प्रवेश तिकीट आहे. पार्किग तिकीट, प्रवेश तिकीट मग खेळण्याचे तिकीट असे तिकीट गोळा करून आपण आत पोहचतो. मात्र, थोडीशी निराशाच पदरी पडते कारण आतमध्ये आहे. मोडकी व काहीशी तुटलेली खेळणी. नवीन असताना येथे ब:यापैकी खेळणी शाबूत होती. मात्र, आता त्याची ब:यापैकी वाट लागलेली दिसते. असू देत. येथून दुर्गादेवी टेकडीवर जाण्यासाठी मार्ग आहे. या टेकडीवर आजुबाजूच्या परिसरातील लोक सकाळी व संध्याकाळी पाय मोकळे करायला येतात. तसेच नवे जोडपे काही तरुण-तरुणीही आडोश्याला बसलेले पाहायला मिळतात. टेकडीवरून जुना पुणो-मुंबई रस्ता, निगडी, प्राधिकरण, रावेतचा परिसर दिसतो व शहर व गावांचे पुन्हा शहर कसे घडते ते पाहायला मिळते. लहानपणी येथे खेळायला जायचो तेव्हा टेकडीवरून संध्याकाळी 5.30 वाजता बाहेर पडण्याचे आदेश मिळायचे. टेकडीचा काही भाग देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे आरक्षित असल्यामुळे काही ठिकाणी ‘नो एंट्री’चा बोर्ड ही पहावयास मिळतो. लोकांच्या सोईसाठी या ठिकाणी मोठी झाडी निर्माण केली आहे. टेकडीवर वर्पयत रस्ते व आजुबाजूला बागकाम केल्याने येथे उन्हाळय़ात हिंडायला मजा येते.

दुर्गादेवी मंदिर :

दुर्गादेवीच्या मंदिरावरून या टेकडीला दुर्गादेवीटेकडी नाव पडले. हे मंदिर सुद्धा छान आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखली जाणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने या टेकडीवरून अनेकवेळा वृक्षारोपण केल्याने टेकडी हिरवीगार झाली आहे.

भक्ती-शक्ती शिल्पसमूह :





महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजीमहाराज व संत तुकाराममहाराज यांचे मोठय़ा आकारातील शिल्प या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी निगडी जकात नाक्यावर आलेल्या गाडय़ा थांबत असत. सध्या येथे एका टेकडीवजा उंचवटय़ावर हिरवळ लावली असून, त्याच्या मध्ये भक्ती-शक्ती शिल्पसमूहाची मूर्ती लावली आहे. दिवाळी पाडव्याला या ठिकाणी असंख्य पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला जातो. येथून  समोर दिसणारे श्रीकृष्णाचे मंदिर असून, ते पाहण्यासारखे आहे.  सध्या भक्ती-शक्तीसमूहाच्या येथे चौपाटी निर्माण झाली. भेळ, वडापाव, चायनीज गाडय़ांचे स्टॉल, लहान मुलांसाठी खेळणी त्यामुळे येथे रात्री 9 वाजेर्पयत गर्दी असते.

देहूगाव :

निगडी जकात नाका, भक्तीशक्ती शिल्पसमूह सोडल्यावर अंदाजे 2 किलोमीटरवर देहूफाटा आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाताना उजव्या हाताला देहूगावाकडे जाणारा  रस्ता आहे. पुणो-मुंबई रस्त्यावर आकर्षक कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूस वीणा असून, ‘जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज प्रवेशद्वार’ असे लिहिले आहे. येथून देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतून रस्ता जातो. देहू तीर्थस्थान असल्यामुळे रस्ता ब:यापैकी चांगला केलेला आहे.


संतश्रेष्ठ श्री तुकाराम महारांजाचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेलेचे सांगितले जाते. देहू गावात वृंदावन, विठ्ठल मंदिर, चोखामेळयाचे मंदिर अशी स्थाने पाहण्यासारखी आहेत. तुकारामबीजेला देहूत उत्सव असतो.  या ठिकाणी  सुमारे 1 एकरावर उभारलेले गाथा मंदिर सुंदर असून, संपूर्ण मंदिर पांढ:या रंगाने रंगवलेले आहे. मंदिर इंद्रायणी तिरावर असून, मंदिर परिसर सुशोभीत केलेला आहे. मुख्य मंदिरात तुकाराममहाराजांची मोठी मूर्ती असून, येथे तुकाराम गाथेच्या ओव्या भिंतीवर कोरल्या आहेत. एकूण तीन मजले असून आतमध्ये पौराणिक देखावे मूर्तीच्या स्वरूपात कोरले आहेत. यात भक्तप्रल्हाद, संत ज्ञानेश्वरमहाराज, विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे. ज्या इंद्रायणी डोहात तुकारामाचे अभंग बुडवले तो डोहही इंद्रायणीकाठीच आहे.

गाथा मंदिर









जायचे कसे :

पुण्याहून स्वारगेट, मनपा भवन, पुणे स्टेशन येथून थेट निगडीर्पयत बस उपलब्ध आहेत. 1 ते 1.30 तासात तेथून येता येते. नंतर पायी चालत अथवा रिक्षा करून 10 ते 15 मिनिटांत प्रथम अप्पूघर व नंतर भक्ती-शक्तीला भेट देता येते. तसेच येथून आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आहे. तेथूनही गाडय़ा उपलब्ध आहेत. निगडी जकात नाक्याला थांबून देहूगावकडे जाणारी बस पकडता येते.

No comments:

कॉपी करू नका